'बदल' हा समाजाचा मूळ पाया आहे. म्हणूनच प्रत्येक क्षेत्रात कालांतराने बदल होणारच. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात काळानुरूप काही चांगले-वाईट परिणाम होणार; मात्र त्याबद्दल नाकं मुरडता कामा नयेत, असे मत सिनेअभिनेता अतुल कुलकर्णी यांनी येथे व्यक्त केले.
"राष्ट्रीय शिक्षण संस्थे'च्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, विष्णूनगर शाखेच्या "माजी विद्यार्थी संघा'तर्फे घेण्यात आलेल्या "काही सांगायचं होतं...' या मुलाखतपर कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी अतुल कुलकर्णी आणि सिनेअभिनेत्री अमृता सुभाष यांची मुलाखत अमरेंद्र पटवर्धन यांनी घेतली.
या वेळी अमृता सुभाष यांनी "देवराई' आणि "वळू' चित्रपटातील काही प्रसंग कथन करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. "राजकारण, समाजकारण आणि मराठी चित्रपटांची आजच्या काळातील अवस्था' या विषयावर अतुल यांनी आपली परखड मते व्यक्ती केली. राजकीय प्रगल्भता केवळ राजकारण्यांसाठीच नव्हे, तर जनतेसाठीदेखील आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.
या वेळी त्यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटांत काम करताना आलेल्या अनुभवांचे कथन केले.
"अवघाचि संसार'मुळे प्रकाशझोतात आलेल्या अभिनेत्री अमृता सुभाष यांनी सध्यातरी ही मालिका बंद करण्याचा दिग्दर्शकाचा विचार नाही, असे सांगितले. केवळ प्रेक्षकांच्या पसंतीमुळे तीन वर्षे ही मालिका सुरू आहे, असे त्या म्हणाल्या. रसिकांच्या आग्रहाखातर अतुल कुलकर्णी यांनी "सरफरोशी की तमन्ना', तर अमृताने "पानिसा निर्मल हो मेरा मन' ही गाणी सादर करून रसिकांची मने जिंकली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार संजय केळकर यांनी भूषविले. राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. खर्डेकर, स्वामी विवेकानंद विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका दीपाली काळे उपस्थित होत्या.
छोटीसी ओळख........
- माजी विद्यार्थी संघ
- माजी विद्यार्थी संघाच्या (मा. वि. सं ) ब्लॉगमध्ये आपले स्वागत. स्वामी विवेकानंद विद्यामंदिर,विष्णूनगर शाळेच्या माजी विद्यार्थी संघाची स्थापना 1995 मध्ये डोके मॅडम यांनी काही विद्यार्थ्यांच्या मदतीने केली. तेव्हापासून गेली 14 वर्षे मा.वि. सं सामाजिक,सांस्कृतिक,शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रांत आपला ठसा उमटविण्यात यशस्वी झाला आहे. सध्या जग बरंच फास्ट झालंय. इंटरनेटच्या या युगात सर्वांशी कनेक्टेड राहण्यासाठी एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म मिळावा , फोटोज व व्हिडीओज शेअर करता यावेत यासाठी हा खटाटोप. ज्यांना मा. वि. सं च्या कार्यात प्रत्यक्ष सहभागी होता येत नाहीये पण इच्छा मात्र खूप आहे त्यांना मा. वि. सं च्या कार्यक्रमांची माहिती इथे मिळेल. मा. वि.सं च्या ऑर्कुट कम्यूनिटीला नक्की भेट द्या. (click on the link below) http://www.orkut.co.in/Main#Community.aspx?cmm=8970605 लोभ आहेच तो वृद्धिंगत व्हावा हीच आशा.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment